मुंबई :- दापोली येथील कथित साई रिसॉर्टच्या गैरव्यवहार प्रकरणी शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे बंधू सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) अलीकडे अटक केली आहे. सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटकेमागे रामदास कदम यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी केली. यावर रामदास कदम यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.
सदानंद कदम यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईत माझे हात, पाय आणि डोकेही नाही. महाराष्ट्राला माहिती आहे, मी समोर अंगावर जातो, पाठीत खंजीर खुपसण्याचं काम कधीच केले नाही. ईडी माझे ऐकणारी असती, तर अनिल परबांना आतमध्ये टाकण्यास सांगितले असते . कारण, अनिल परबांनी (Anil Parab) माझ्या मुलाला प्रचंड त्रास दिला. राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला होता. उद्धव ठाकरेंनी अनिल परबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्याचा प्रयत्न केला.
अनिल परबांनी सदानंद कदमांना फसवले आहे. हे स्वत: वकील असल्याने सर्व कागदपत्रे स्वत:च्या नावावर ठेवली नाहीत. परवानगीचा अर्ज आणि लाईट बिल अनिल परबांच्या नावावर आहे. सदानंद कदमांना यांना अनिल परबांनी बळीचा बकरा बनवले आहे. सदानंद कदमांचा काही संबंध नसेल तर निश्चित ते बाहेर पडतील. याप्रकरणात अनिल परबांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रामदास कदम यांनी केली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभेबद्दलही रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंनी रामदास कदमांचा धसका घेतला होता. त्यांना अख्ख्या महाराष्ट्रातून लोक बोलवावी लागली. त्यांच्या पाठीशी कोकण नव्हतं, उभा महाराष्ट्र होता. १९ तारखेला होणार सभा कोकणवासीयांची असणार आहे. कोकणवासीय एकनाथ शिंदे आणि माझ्या पाठीशी खंबीर उभे आहेत, असेही कदम म्हणाले.