Raj Thackeray : रवींद्र धंगेकर उद्या राज ठाकरेंची भेट घेणार? मुंबईत ‘यांच्याशी’ होणार गाठीभेटी

The Political Observer Staff By The Political Observer Staff
1 Min Read

मुंबईः कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर उद्या राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेटीसाठी उद्या धंगेकर मुंबईकडे रवाना होत आहेत.

कसबा पेठ मतदारसंघात मागील २८ वर्षांच्या भाजपच्या गडाला तडे देऊन धंगेकर विजयी झाले. भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करुन विजयी झालेल्या धंगेकरांची राज्यभर चर्चा आहे. मरगळ आलेल्या महाविकास आघाडीला यामुळे नवी चेतना मिळण्याची परिस्थिती निर्माण झालीय तर दुसरीकडे भाजपला हा सर्वात मोठा धक्का समजला जातोय. हेच धंगेकर उद्या मुंबई दौऱ्यावर जात आहेत.

रवींद्र धंगेकर उद्या सकाळी ८ वाजता पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मुंबईत ते महाविकास आघाडीमधील नेत्यांची भेट घेणार असून काँग्रेसचे वरिष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचीही ते भेट घेतील.

विशेष म्हणजे मुंबईत असल्यामुळे धंगेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रवींद्र धंगेकर यांचा आमदार पदाचा शपथविधी ९ मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे ते उद्या मुंबईकडे रवाना होत आहेत.

नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि अश्विनी जगताप हे परवा विधीमंडळ सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. शपथविधी पार पडल्यानंतर हे दोघेही आमदार सध्या सुरु असलेल्या राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही हजेरी लावणार आहेत.

 

Share This Article
Leave a comment