मुंबई – चित्रपटासाठी देण्यात येणारे अनुदान ३ महिन्यांच्या आत देणं आता बंधनकारक करणार असून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना यापुढे दुप्पट अनुदान देणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत केली.
यासंदर्भात विधान परिषद सदस्य विलास पोतनीस यांनी ३१ ऑक्टोबर २०२२ अखेर २५९ प्रलंबित चित्रपट परीक्षणाबाबत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, केवळ २ वर्षाच्या आतील चित्रपट हे अनुदानासाठी पात्र राहणार असून, प्रेरणादायी चित्रपटांसाठी आता १ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त अनुदान मिळणार आहे.
राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना दुप्पट अनुदान देण्यात येईल, असेही सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. २०२०- २०२२ या महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनुदानासाठी अर्ज करण्यात आलेल्या एकाही चित्रपटांचं परीक्षण करण्यात आलं नाही याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधलं.