बाळासाहेबांची खरी शिवसेना शिंदेंचीच- फडणवीस

2 Min Read

नागपूर: स्व. बाळासाहेब ठाकरेंचा वैचारिक व राजकीय वारसा एकनाथ शिंदेंकडे असून त्यांची शिवसेना ही खरी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपुरातील प्रेसक्लब येथे मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.

शिवसेनेतील बहुसंख्य आमदार शिंदेंच्या नेतृत्त्वात वेगळे निघाल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर खरी शिवसेना ठाकरेंची की, शिंदेंची असा वाद निर्माण झालाय. यापार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे हे स्व. बाळासाहेबांचे सुपुत्र असून त्यांचे कौटुंबिक वारसदार आहेत. परंतु, राजकीय आणि वैचारिक वारसदार एकनाथ शिंदे हेच आहेत. बाळासाहेबांनी आयुष्यभर जोपासलेली तत्त्वे, विचारधारा आणि ध्येय-धोरणांचे पालन शिंदेच करीत आहेत. त्यामुळे खरी शिवसेना शिंदेंचीच यात दुमत नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवसेना संपवायला कोण निघाले आहे हे उठाव करणाऱ्या शिवसेना आमदारांनी वारंवार सांगितले आहे. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांना हे कळत नसेल तर ईश्वरच जाणो असा टोला फडणवीसांनी लगावला.

सत्ता स्थापनेच्या घडामोडींवर ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझा होता. पक्षाने त्याला मान्यता दिली, अशी माहिती त्यांनी दिली. शिवसेना आमदारांचे बंड नसून उठाव होता. शिवसेना आमदारांची खदखद पहिल्या दोन महिन्यांत लक्षात आली होती. आम्ही त्यावर नजर ठेवून होतो असे फडणवीस यांनी सांगितले.या सरकारला बाहेरून मदत करण्याची मानसिकता तयार केली होती. पण मोदी, शहा यांनी मला सरकारमध्ये राहाण्यास सांगितले. घटनाबाह्य सत्ताकेंद्र असणे पक्षालाही मान्य नव्हते. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार पद स्वीकारल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. विकासाच्या मुद्यावर बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, विदर्भ, मराठवाड्यासह मागास भागाचा विकास होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. आणि विदर्भ तर आमच्या अजेंड्यावर आहे, असे ते म्हणाले. हिवाळी अधिवेशन नागपुरातच होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करू असे आश्वासनही फडवीसांनी दिले. एका व्यक्तीने महाराष्ट्राचे राजकारण कलुषित केलं आणि येथील सुसंस्कृतपणा खड्ड्यात घातला अशी टीका कुणाचेही नाव न घेता केली. मंत्रिमंडळ स्थापन करण्याबाबत सध्या काहीही ठरले नाही. लवकरच चर्चा करून मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राज्याच्या काही भागात पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाल्यास पुरेशा प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment