मुंबई: आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालायीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान राणा दाम्पत्याने जामीनासाठी अर्ज केला आहे. मात्र त्यावर तातडीने सुनावणी करण्यास वांद्रे न्यायालयाने नकार दिला असून सरकारी पक्षाला २७ एप्रिलपर्यंत लेखी म्हणणे मांडायचे आहे. जामीन अर्जावर सुनावणी २९ एप्रिलला होणार असल्याचे न्यायालायाने म्हटले आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला तोपर्यंत कारागृहात राहावे लागणार आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. प्रदीप घरत यांनी, तर राणा दाम्पत्याच्या वतीने अॅड. रिझवान मर्चंट यांनी बाजू मांडली.
काय आहे प्रकरण
मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी दिले होते. त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवस विविध घडामोडी घडल्या. त्यानंतर शनिवारी दुपारी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर रविवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले की, सरकारविरोधी वक्तव्य करणे, आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्याविरोधात कलम १२४ अ हे राजद्रोहाशी संबंधित कलम लावण्यात आले आहे. दोघांना वारंवार सूचना दिल्यानंतरही सरकार विरोधात विधाने केली होती. राजद्रोहाचा गुन्हा हा अजामीनपात्र असून, त्याला जामीन मिळू शकत नाही.
दरम्यान, राणा दाम्पत्याचे वकील मर्चंट यांनी सांगितले की, हनुमान चालिसा म्हणणे हे सरकार विरोधात प्रक्षोभक वक्तव्य असू शकत नाही. त्यामुळे हे आरोप बिनबुडाचे आणि आपल्या अशिलाला केसमध्ये अडकवण्याचे प्रयत्न आहेत. पहिल्या एफआयआरमध्ये कलम १५३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. दुसऱ्या एफआयरमध्ये ३५३ कलमाचा उल्लेख करण्यात आला, तर मग पहिल्या एफआयआरमध्ये ३५३ चा उल्लेख का नव्हता असा सवाल मर्चंट यांनी केला. कलम ३५३ सरकारी कामात अडथळा आणणे आणि कलम १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा नवनीत राणा रवी राणा यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.